रात्री त्या शेतकऱ्याच्या कुटुंबात मी राहिलो. खुल्या आकाशाखाली काथ्याच्या खाटेवर पडल्या पडल्या मी विचार करत होतो. दोन-तीन दिवसांपूर्वी तर मी माझ्या परिचित वातावरणात माझ्या आप्तेष्टांबरोबर होतो. आज या अगदी नवख्या जागेची ओळख झाली. एका संध्याकाळच्या या ओळखीत असं काही अनुभवलं जे माझ्या आयुष्याचा न विसरणारा भाग बनून गेलं. छोटी जानकी माझी जणू खूप वर्षांच्या ओळखीची वाटू लागली! उद्या मी इथून पुढे जाईन, पुन्हा कधी या सगळ्यांना भेटेन की नाही तेही ठाऊक नाही. जानकी, वालबाई अन् तिचा नवरा यांचा निरोप घेताना मला वाईट वाटेल का? वाईट कदाचित् नाही वाटणार पण उदास नक्की वाटेल. असं का होतं? एवढ्याशा ओळखीत एवढी जवळीक वाटणं हे माझ्या नागरी संस्कृतीत बसतच नाही, माझ्या संवर्धनात अशा वाटण्याला जागाच नव्हती, मग या इवल्या दुनियेबद्दल मला का एवढी जवळीक वाटतेय?