भावनांच्या वेढ्यात अडकलेल्या अक्षरांतून निर्माण झालेल्या विलक्षण शब्दांचे, अनुभवांचे चोचले पुरवले, की जन्मते स्वतंत्र दरवळणारी कविता. जिचा दरवरळ श्वासासह पुऱ्या देहाशी एकरूप होतो. फुलांच्या दरवळात दडून बसलेल्या परागकणांसारखेच, कवितेच्या शब्दात दडून बसलेले अनुभव सुद्धा आयुष्य फुलवून टाकतात. एका व्यक्ति-विशेषाचे अनुभव दुसऱ्या व्यक्ति-विशेषाशी जोडणारे, कविता हे प्रगल्भ माध्यम आहे. सदर संग्रहातील कविताही अश्याच विविध अनुभवांचे प्रतिबिंब आहेत. प्रत्येक कविता ही काही कवीच्या अनुभवांची रूपरेषा नसते. ऐकलेल्या, वाऱ्याबरोबर सोबत आलेल्या, अनुभवलेल्या किस्स्यांच्या सरमिसळीतून जे माझ्या अल्पमनाला सुचले, ते कवितेत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. संग्रहात बाल कवितांपासून ते सामाजिक मुद्यांवर भाष्य करणाऱ्या कवितांचा सामावेश आहे. त्याच प्रकारे, मुक्तछंद व गझलांचाही समावेश आहे. कवितेचा गाभा शब्दात दडला असला, तरी त्या गाभ्याचे दिव्यपण मात्र त्यात दडलेल्या भावनांमध्ये असते. कविता वाचण म्हणचे केवळ यमकात आणि ओळीत अडकवलेल्या शब्दांचे वाचन नसून, त्या शब्दांमध्ये पेरलेल्या भावनांना समजून घेण्याचा अनुभव आहे. कवितेतले अनुभव वेचण्याची कला एकदा का अंगी भिनली, की कविता वाचताही येते आणि जगताही! शेवटी कवितेचा आनंद घेणे महत्त्वाचे.