ओंकारनाथ व्यंकटेश भस्मे (सोलापूर) ह्यांना दीर्घ काळ शंकर महाराजांचा सहवास लाभला, पुढे शंकर महाराजांचे परवानगीने व भस्मे ह्यांचे मार्गदर्शन ह्याचे सहाय्याने श्री अघोर ह्यांनी ह्या प्रासादिक पोथी ची रचना केली. शंकर महाराज हे स्वामी समर्थ महाराजांशी पूर्ण एकरूप झालेले होते. त्याचं चरित्र व त्यांनी केलेलं कार्य अचंबित करणार आहे.
माझ्या सद्गुरूंचे स्मरण झाले की, माझे सर्व शरीर आनंदाने पुलकित होते. माझ्या सद्गुरूंचे माझ्यावर अनंत उपकार आहेत. माझ्या सद्गुरूंचा मला दीर्घकाळ सहवास व त्यांची दीर्घकाळ सेवाही घडली. माझ्या सद्गुरुंना साकार करावे, शद्बबद्ध करावे अशी माझी फार वर्षांपासूनची इच्छा होती. माझे स्नेही श्री. भगवंतराव अघोर यांनी महाराजांचे चरित्र लिहिण्याविषयी फार वर्षांपूर्वी मला विचारले होते. पण त्या वेळी महाराजांचा आदेश नसल्याने मी गप्प बसलो. पण महाराजांचा मला जेव्हा आदेश झाला तेव्हा श्री. अघोर यांना मी महाराजांचे चरित्र लिहिण्याची विनंती केली. श्री. अघोर यांनी माझी विनंती मान्य करून चरित्र लिहिण्यास सुरुवात केली.
महाराजांचे चरित्र अत्यंत प्रचंड असल्याने एवढा मोठा प्रचंड ग्रंथ कोण वाचणार? ग्रंथ शक्यतो लहान व महत्त्वाच्या घटनांचा आणि कोणालाही वाचणे सुलभ होईल असा असावा असे मला वाटे. तेवढ्यात महाराजांनी श्री. अघोर यांना 'अरे, ही शंकर गीता आहे.' असा दृष्टांत देऊन ग्रंथाचे नामकरणही केले व अध्यायांची संख्याही निश्चित केली. श्री. अघोर यांनी मोठ्या कौशल्याने १८ अध्यायांत माझ्या सद्गुरुंना बहारीने नटविले, सजविले. महाराजांच्या सर्वच शिष्यांना श्री. अघोर यांनी ऋणी केले आहे. एवढे हे चरित्र उत्कृष्ट, समर्पक, सुंदर व सर्व वाङ्मयीन गुणांनी सुशोभित असून भक्तिभावांनी बहरलेले आहे याची प्रचिती ग्रंथ वाचताक्षणी येते.
याबद्दल श्री. अघोर यांना धन्यवाद !
-