"सांगायलाच हवंय, असं नाही" या 2015 साली ' सृजन प्रकाशन'ने प्रसिद्ध केलेल्या माझ्या पहिल्याच काव्यसंग्रहाला आतापर्यंत महाराष्ट्रातील प्रतिष्ठेचे जवळ जवळ पंधरा पुरस्कार मिळाले आहेत. या संग्रहाची " श्री भैरी भवानी प्रकाशन' ने दुसरी आवृत्तीही काढली.
या संग्रहानंतर दुसऱ्याच वर्षी "एका कवीच्या दुःखाचे भाषांतर" या शीर्षकाचे काव्यनाट्याचे पुस्तकही प्रकाशित झाले. पुण्याच्या "संवेदना प्रकाशन"ने ते प्रकाशित केले. या पुस्तकाचीही बऱ्यापैकी चर्चा झाली. पुस्तकावर अभिवाचनाचे जाहीर कार्यक्रमही झाले.
त्यानंतर 2017 साली " तलवारीच्या पात्यावर थरथरणारे फुलपाखरू" या दीर्घ कवितेचे छोटेखानी पुस्तक प्रकाशित झाले.
ही पुस्तके प्रकाशित होण्यापूर्वी मी पाच पुस्तकांचेही संपादन केले होते. आता " चोळामोळा काळाचा आंधळा डोळा" "त्रेपन्न" "आरस्पानी डोळ्यातील बाईपणाचा सुरमा" "अनुक्रमणिका नसलेलं आयुष्य" व "गाळलेल्या जागी भरलेले शब्द" हे काव्यसंग्रह येऊ घातले आहेत.
विशेष म्हणजे, जग खूप झपाट्यानं बदलत चाललं आहे. विकसित माहिती तंत्रज्ञानानं सारं विश्व खूप जवळ आलं आहे. संपूर्ण जग एक कुटुंबं बनत चाललं आहे. या झपाट्यानं बदलत चाललेल्या जगासोबत आपण चाललो नाही तर आपण खूप मागे पडू ही रास्त धारणा होऊन बसली आहे. परिवर्तन हा सृष्टीचा नियम असल्यानं या बदलाला सामोरं जाणं सगळ्यांनाच भाग पडत आहे. जगभर आमूलाग्र क्रान्ति घडत आहे. येणारी नवी नवी प्रसार माध्यमं आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनली आहे. " जुनं ते सोनं " असलं तरी नवं हे हिऱ्यासारखं बहुमूल्य असू शकतं हेही समजून घ्यायला हवं.
सांगायचा मुद्दा हा की, माझ्या प्रकाशित तीनही पुस्तकांची आता ईपुस्तकं आली आहेत. शैलेश खडतरे या हुन्नरी मित्रानं जेंव्हा माझी पुस्तकं ईपुस्तक स्वरूपात काढण्याची कल्पना सविस्तरपणे माझ्यासमोर मांडली तेंव्हा मला नकार देणं जीवावर आलं. कारण त्यानं चर्चेत त्याच्या संस्थेबद्दल जे काही सविस्तरपणे, मनमोकळे, कुठलाही आडपडदा न ठेवता सांगितलं. Bronato ही शैलेश आणि त्याच्या टीमची संस्था असून अल्पावधीतच ती लोकमान्य आणि परिचित झाली आहे. या संस्थेचा प्रचार आणि प्रसार झपाट्यानं वाढतो आहे. ईपुस्तक प्रकाशक, वितरक असलेल्या Bronato तर्फे माझी पुस्तकं किंडल व गुगल प्ले बुक्सवर झळकली याचा मला मनापासून आनंद झालेला आहे. या संस्थेतर्फे मराठी साहित्यातील उत्तमोत्तम पुस्तकं किंडलवर प्रकाशित व्हावीत आणि मराठी भाषेचा झेंडा जगभर लहरत राहावा, अशी मंगल कामना मी व्यक्त करतो.
- भगवान निळे
काव्यसंग्रह :
सांगायलाच हवंय, असं नाही...
(सृजन प्रकाशन, २०१५)
नाटक :
एका कवीच्या दुःखाचे भाषांतर
(संवेदना प्रकाशन, २०१७)
संपादित :
शब्द ८६ (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
(शब्द साहित्य प्रकाशन, १९८६)
अस्वस्थ काळजावरचं मोरपीस (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
संपादन : भगवान निळे / प्रकाश ग. जाधव
(एकता कल्चरल अकादमी २०१२)
जुडगा कवितेचा (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
संपादन : भगवान निळे / प्रकाश ग. जाधव
(एकता कल्चरल अकादमी २०१३)
काव्यचावडी (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
संपादन : भगवान निळे / प्रकाश ग. जाधव
(एकता कल्चरल अकादमी २०१४)
अंधारातला जागल्या (आ. सो. शेवरे यांच्या कविता)
संपादन : भगवान निळे / विजय ना. जाधव
(सृजन प्रकाशन २०१६)
प्रातिनिधिक काव्यसंग्रह :
दलित प्रेमकविता
(संपादन : शरणकुमार लिंबाळे)
दलित आवाज (उर्दू)
(संपादन : याकूब राही)
कविता नक्षलबारीच्या
निर्णायक युद्धानंतर
(संपादन : बबन लोंढे / सुधाकर गायकवाड)
आगामी :
जोडाक्षर (प्रातिनिधिक काव्यसंग्रह)
(लोकनाथ यशवंत / भगवान निळे)
तलवारीच्या पात्यावरील थरथरणारे फुलपाखरू (काव्यसंग्रह)